जळगाव : प्रतिनिधी
सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या पिंप्राळा येथील मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर (वय ४७, रा. पिंप्राळा) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सावखेडा येथील तक्रारदार यांच्या सातबारा उताऱ्यावरून तक्रारदार यांच्या वडिलांचे व आते भावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी त्यांनी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात दि. १६ मे रोजी अर्ज केला होता. त्यानंतर दि. २० मे रोजी तलाठी कार्यालयात येऊन या प्रकरणाची चौकशी केली असता मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजाराची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. २७ मे रोजी – लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे कार्यालयात येवून तक्रार दिली. त्यानुसार पथकाने गुरूवार दि. ६ जून रोजी सापळा रचून मंडळाधिकारी किरण बाविस्कर हे ५ हजारांची लाच घेत असतांना – पथकाने रंगेहाथ पकडले.



