जळगाव : प्रतिनिधी
रेल्वे स्थानकावर ओळख झालेल्या छत्तीगढ येथील परप्रांतीयाने भुसावळातील तरुणासोबत कुसुंबा येथे भागीदारीमध्ये ऑनलाईन गेमिंग सेंटर सुरु केले. केवळ चार ते पाच दिवसात या तरुणाने पैशांसाठी आपल्या भागीदारासह गेम खेळण्यासाठी येणाऱ्या अन्य दोघांच्या अपहरणाचा कट रचला. त्यानंतर छत्तीसगढ येथील साथीदारांच्या मदतीने जळगावातून तिघांचे अपहरण करीत त्यांना छत्तीसगढमधील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले. तरुणांच्या सुटकेसाठी २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या परप्रांतीय अपहरणकर्त्यांच्या टोळीच्या एमआयडीसी पालिसांनी पर्दाफाश करीत छत्तीसगढ येथून चौघांच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील विशाल अनिल शुबवानी याची रेल्वे स्थानकावर छत्तीसगढ येथील एका जणासोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांनी जळगावातील कुसुंबा येथील सीटी सेंटर याठिकाणी भागीदारीमध्ये ऑनलाईन गेमिंगचा व्यवसाय सुरु केला. याठिकाणी रोहीस कैलास दर्डा, अजय ठाकरे हे देखील ऑनलाईन गेमिंग खेळण्यासाठी येत होते. ऑनलाईन गेम खेळणाऱ्या य तिघांकडे भरपूर पैसे असल्याच भागीदाराला संशय आला, आणि त्याने या तिघांचे अपहरण करण्याचा प्लॅन तयार केला. अपहरणासाठी त्याने छत्तीसगढ व उत्तरप्रदेशातील आपल्या सहकाऱ्यांना जळगावात बोलावून घेतले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास रोहीत कैलास दर्डा, विशाल अनिल शुबवानी व अजय ठाकरे या तिघांना मारहाण करीत त्यांना चारचाकी वाहनात बसवून त्यांचे अपहरण करीत सागर लुल्ला यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना दि. २ जून रोजी उघडकीस आली होती.
अपहरण केलेल्या तरुणांच्या जीवाचे बरेवाईट होवू नये, म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती न देता. परस्पर १ लाख ९० हजार रुपये अपहरणकर्त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. परंतू त्यांच्याकडून पुन्हा आणखी खंडणीची रक्कम मागितली जात असल्याने सागर लुल्ला यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, योगेश बारी, चंद्रकांत पाटील, किरण पाटील, चंदू पाटील, गणेश ठाकूर दहा तास तपास केला.