जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा अधिक असल्याने प्रत्येक घरात कुलरचा वापर केला जात आहे. प्रामुख्याने खिडकीत लावण्यासाठी डेझर्ट कुलर वापरले जातात. दरम्यान बाहेरून आल्यानंतर कुलर लावून त्यात पाणी टाकत असताना विजेचा जोरदार झटका बसला. यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडली. तर या घटनेत लहान मुलगा थोडक्यात बचावला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील बिबानगर परिसरात वास्तव्यास असलेले भास्कर आत्माराम बोरसे (वय ४८) यांचा मृत्यू झाला आहे. भास्कर बोरसे हे राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. मूळ जळगाव तालुक्यातील कठोरा येथील रहिवासी असून मुलांचे शिक्षण आणि ड्यूटीमुळे जळगावात स्थायिक झाले होते. दरम्यान १ जूनला ते ड्यूटी आटोपल्यानंतर दुपारी घरी आले. उकाडा होत असल्याने त्यांनी कुलर लावले. मात्र त्यात पाणी नव्हते. यामुळे त्यांनी कुलर चालू असताना त्यात पाणी टाकायला गेले. यावेळी कूलरचा जोरदार धक्का लागून ते दूरवर फेकले गेले. त्यात ते जागीच बेशुद्ध पडले. घडलेला प्रकार पाहून मुलगा धावला. यात त्यालाही विजेचा धक्का लागला, मात्र तो थोडक्यात बचावला. या प्रकारामुळे बोरसे यांच्या घरात एकच आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेतली. तत्काळ बोरसे यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.