जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने समोर आलेला खड्डा चुकविताना आपल्याला कट मारल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी जुनेद अख्तर गंभीर खान (२४, रा. आझादनगर) या तरुणाला पाठलाग करून बेदम मारहाण केली. त्याला रोडवर खाली पाडून दगडाने व चाकूने वार केल्याने तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. ही घटना शनिवार, ११ मे रोजी रात्री फातेमा नगर ते सुप्रीम कॉलनीदरम्यान घडली. याप्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, ११ मे रोजी रात्री मनियार सलमान खान अब्दुल गफ्फार (२५, रा. उस्मानिया पार्क), इकरामोद्दीन अमिनोद्दीन शेख व जुनेद अख्तर गंभीर खान हे दुचाकीने फातेमा नगरकडून जळगाव तोल काट्याकडे जात होते यात इकरामोद्दीन शेख हा दुचाकी चालवत असताना, समोर खड्डा आल्याने तो चुकविताना समोर एक दुचाकी आली. त्या दुचाकीस्वारांना आपल्यालाच कट मारल्याचा संशय आल्याने त्यांनी या तिघांसोबत वाद घालत शिवीगाळ केली. तसेच मोबाइल करून काही जणांना बोलावले. तेथे तीन ते चार जण आल्याने तिघेही जण वेगवेगळ्या दिशेने पळाले.