जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा येथील एक कुटुंब ४ मे रोजी उन्हाळ्याचे दिवस असल्याने गच्चीवर झोपले असताना, रात्री चोरट्यांनी घरफोडून १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नामदेव पंडित पाटील (६४) हे रायपूर येथील मराठी शाळेत सुरक्षारक्षकाचे काम करतात. ते शनिवारी ४ मे रोजी कुटुंबासोबत गच्चीवर झोपले होते. ५ मे रोजी सकाळी उठल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचे त्यांना दिसले. घरात पाहणी केली असता, कपाट देखील फोडले होते. चोरट्यांनी घरातून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ३३ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या, ३६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व १४ हजार रुपये चांदीचे ब्रेसलेट असा एकूण १ लाख ३० हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहेत.