जळगाव : प्रतिनिधी
‘देख के चल’ असे सांगितल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांनी प्रशिक ईश्वर जाधव (२३, रा. गेंदालाल मिल) यांच्यासह त्यांच्या बहिणीला मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी जाधव हे घरात गेले असता त्यांच्या घरात घुसून टोळक्याने साहित्याची नासधूस केली. ही घटना बुधवार, १ मे रोजी दुपारी ११ वाजता घडली. याप्रकरणी गुरुवार, २ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, हमाली काम करणारे प्रशिक जाधव हे कानळदा रस्त्यावर असताना ते तन्या (पूर्ण नाव समजू शकले नाही) याला ‘देख के चल’ असे बोलले त्याचा राग आल्याने तन्यासह अन्य चार ते पाच जणांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच, प्रशिकच्या बहिणीलादेखील मारहाण केली. या मारहाणीत प्रशिकच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत केली. जीव वाचवत ते घरात घुसले असता टोळक्याने घरावर दगडफेक करीत घरातील साहित्याची नासधूस केली. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जाधव यांनी गुरुवार २ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तन्यासह अनोळखी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वीरेंद्र शिंदे करीत आहेत.