अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील डांगरी येथे एकाने तिघांवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना २५ रोजी रात्री नऊ ते साडेनऊदरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी नाना रामभाऊ शिसोदे (वय ६३) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सविस्तर वृत्त असे कि, डांगरी येथील प्रकाश उत्तमराव शिसोदे व राजेंद्र भीमराव शिसोदे हे त्यांच्या अंगणात खाट टाकून रात्री गप्पा मारत असताना गल्लीतील नाना रामभाऊ शिसोदे हा दोन-तीनवेळा त्यांच्याजवळून चक्कर मारून गेला. रात्री ९ ते साडेनऊदरम्यान नाना पुन्हा परत आला आणि त्याने राजेंद्र शिसोदे यांच्या मागाहून येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अचानक हातातील चाकूने राजेंद्र यांच्या पोटावर, हातावर चाकूने वार करू लागला. त्याला आवरण्यासाठी प्रकाश शिसोदे पुढे गेले असता नानाने त्यांच्याही पाठीवर वार केला. तसेच प्रकाश यांचा मुलगा सारंग शिसोदे याच्याही पोटावर वार करून गंभीर जखमी केले.
तसेच ठार मारण्याची धमकी दिली. त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सारंग आणि राजेंद्र हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकाश शिसोदे यांच्या जबाबावरून मारवड पोलिस स्टेशनला आरोपी नाना शिसोदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्या. स्वाती जोंधळे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.