अमळनेर : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील इंदोर व धारदरम्यान चोरून आणलेला लोखंडाने भरलेला ट्रक एस. एस. टी. पथकाच्या सतर्कतेने तालुक्यातील मुडी मांडळ भागात पकडण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक व लोखंड असा एकूण २० लाखांचा माल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, इंदोर आणि धार जिल्ह्याच्या दरम्यान घाटाबिल्लो येथील इम्रान मोहम्मद शेर मोहम्मद याच्या घरासमोरून १० ते १२ टन लोखंडाने भरलेला ट्रक (एमपी४०/जीए७७८) अज्ञात चोरट्याने २३ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरून नेला. हा ट्रक २४ रोजी पहाटे अमळनेर तालुक्यातील मुडी मांडळ भागातून जात होता.
निवडणूक कामासाठी लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर असलेले विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, हेकॉ भरत गायकवाड व पोकों दिनेश पाटील यांनी ट्रक थांबवून गाडीचे कागदपत्रे मागितली. चालकाने कागदपत्र दिले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्याला खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी तो खाली उतरत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दाट झाडीत पळून गेला. या वाहनात अंदाजे १० लाख किमतीची १० ते १५ टन लोखंडी सळई मिळून आली. वाहनाची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. वाहन व मुद्देमाल मारवड पोलिसात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ भरत इशी हे करीत आहेत. दरम्यान, इम्रान मोहम्मद याने पेटमा (जि. इंदोर) येथे ट्रक चोरीची फिर्याद दिली आहे