जळगाव : प्रतिनिधी
शनी पेठ पोलिस चौकी जवळून बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाने कारवाई करत मंगळवारी दुपारी १ वाजता पकडला. मात्र, चालकाने ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा न करता भरधाव वेगाने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनी पेठ पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, महसूल पथकाने विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास वाळू आढळून आली. ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले असता चालक नवनाथ रोहिदास बाविस्कर (३०, रा. कोळंबा, ता. चोपडा) याने ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात न नेता, पसार झाला. मंडल अधिकारी छाया कोळी यांनी शनी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालक रोहिदास बाविस्कर आणि मालक वैभव चौधरी (रा. चौघुले प्लॉट) यांच्या विरोधात शनी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.