नाशिक : वृत्तसंस्था
सटाणा-नामपूर रस्त्यावरील खिरमाणी फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील वाहकासह सर्व ७६ प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, सटाणा आगाराची प्रतापपूर-सटाणा बस (क्र. एमएच २० बीएल ४२५१) मंगळवारी (दि.२३) दुपारी चार वाजेच्या सुमारास नामपूरहून सटाण्याच्या दिशेने येत असताना खिरमाणी फाट्याजवळ बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक आर. जी. ह्याळीज यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रसंगावधान दाखवत वाहक गोकुळ सूर्यवंशी यांच्या मदतीने बसमधील सर्व ७६ प्रवाशांना सुखरूप बाहेर पडण्यास मदत केली. यावेळी याच रस्त्याने जात असलेले सटाण्याचे माजी नगरसेवक किशोर कदम यांनी थांबून त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्यास मदत केली, तसेच सटाणा पालिकेच्या अग्निशमन विभागास घटनेची माहिती कळविली. मात्र, अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस आगीत भस्मसात झाली होती.