जळगाव : प्रतिनिधी
फिल्टर प्लॅटसाठी घेतलेल्या पाइपांचे थकीत असलेले पाच लाख रुपये वसूल करण्यासाठी गेलेले सूर्यभान हिंमत पाटील (३९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) व त्यांच्या सहकाऱ्यावर चार जणांनी धारदार शस्त्राने वार केला. ही घटना शुक्रवार, १९ रोजी तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाइप व्यावसायिक असलेले सूर्यभान पाटील यांच्याकडून कुसुंबा येथील एका जणाने पाइप घेतले होते. त्याचे पाच लाख रुपये थकीत असल्याने ते घेण्यासाठी पाटील हे कुसुंबा येथील संबंधिताच्या फिल्टर प्लॅटवर गेले व थकीत पैशाची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यावर चौघांनी धारदार शस्त्राने वार केला. यात पाटील यांना दुखापत झाली असून या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील सोनार करीत आहेत