जळगाव : प्रतिनिधी
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफिया विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा याच्यासह सहा जणांवर एमपीडीएअंतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना विविध कारागृहात स्थानबद्ध केले.
सविस्तर वृत्त असे कि, यामध्ये विशाल उर्फ विक्की मांडवा नामदेव सपकाळे (२८, रा. शंकरराव नगर), संदीप गणेश ठाकूर (३०, रा. डीएनसी कॉलेज), विलास वामन कोळी (३८, रा.जळगाव खुर्द, ता. जळगाव), शांताराम सुका बोरसे (४५, रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव), भैय्या मंगल पाटील (३०, रा. चोपडा), छायाबाई रमेश सकट (५८, रा. राजीवगांधी नगर) या हातभट्टी दारु विकणाऱ्यांसह वाळूमाफियांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणारा वाळूमाफिया विशाल सपकाळे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला यासह वाळू चोरीचे चार गंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच त्याचा साथीदार संदीप गणेश ठाकूर या वाळू माफियाविरुद्ध देखील वाळूचोरीसह तीन गंभीर गुन्हे दाखल आहे.
जळगाव खुर्द येथील विलास कोळी याच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत ९, शांताराम सुका बोरसे याच्याविरुद्ध ७ गुन्हे दाखल आहे. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक रामेश्वार मोताळे यांनी तर जळगाव शहरातील राजीव गांधी नगरातील छायाबाई रमेश सकट या महिलेविरुद्ध ८ गुन्हे दाखल असून तिचा प्रस्ताव रामानंद नगर पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तर चोपडा येथील भैय्या मंगल पाटील या हातभट्टीची दारु तयार करुन विकणाऱ्याचा प्रस्ताव चोपडा शहरचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेज्जी यांच्याकडे पाठविला होता. तो मंजूरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला. प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख कालू, पोकों ईश्वर पाटील यांनी पाहिले.