पुणे : वृत्तसंस्था
मोदी सरकारने सत्तेचा उन्माद दाखवला आहे. मोदींकडून गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक सुरू आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. पुण्यात आज खासदार अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”मागील दहा वर्षात मोदींनी अनेक आश्वासने दिली. यामध्ये तरुण वर्गाला रोजगार आणि नोकऱ्या देण्याचा आश्वासन होते. मात्र गेल्या दहा वर्षात देशात नोकऱ्यांचे प्रमाण घटले आहे.
देशभरातील तरुण वर्गापैकी 86% तरुण वर्ग हा बेरोजगार आहे. त्यामुळेच खोटी आश्वासने देऊन गेली दहा वर्षे मोदींकडून जनतेची फसवणूक सुरू आहे. शब्द द्यायचा, आश्वासने द्यायची मात्र कृती करायची नाही ही मोदींची नीती असेल तर त्यांच्या हातात सत्ता न जाण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल”, असे आवाहन शरद पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले, ”सत्तेचा उन्माद काय असतो तो सत्ताधाऱ्यांनी दाखवला. याचे उदाहरण म्हणजे झारखंड आदिवासींचे राज्य आहे. मात्र तिथल्या आदिवासी मुख्यमंत्र्यांना मोदींवर वक्तव्य केल्यावर तुरुंगात टाकण्यात आले. देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे एक उत्तम प्रशासक आहेत. मात्र केवळ मोदींवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकण्यात आला., अशी अनेक उदाहरणे आहेत”, असे शरद पवार यांनी सांगितले.
तसेच ”सत्ता ही लोकशाही जगवण्यासाठी असते मात्र ही लोकशाही उध्वस्त करण्याचे काम मोदींकडून होत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोदी आणि त्यांच्या विचारांचा पराभव करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे” असे पवार म्हणाले. या सभेला पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मोठे शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आज पक्षांतील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.