अमळनेर : प्रतिनिधी
प्रवासी आणि एसटी चालक-वाहकांचे भांडण सोडवायला गेलेल्या चालकांच्या तोंडावर लोखंडी वस्तू मारून जखमी केल्याची घटना १४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांवर दंगल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, समाधान भगवान लांडगे (चालक) हे नाशिक येथून बस घेऊन परत आल्यानंतर, त्यांना बसस्थानकात तीन पुरुष आणि दोन महिला या इतर वाहक आणि चालकांशी भांडण करताना दिसले. ते भांडण आवरायला गेले असता आनंदा नाना पाटील (अंतुर्ली), मोहित किसन वाघ व सारिका मोहित वाघ (दोन्ही रा. सीताराम नगर, उल्हासनगर), अनिल देवराम सोनवणे, मनीषा अनिल सोनवणे (अवधान, ता. धुळे) या पाच जणांपैकी एकाने हातातील लोखंडी वस्तूने समाधानच्या नाकावर मारून रक्तबंबाळ केले. तसेच इतरांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
एका महिलेने खोट्या केसेस करण्याची धमकी दिली. त्याचवेळी इतर वाहक व चालकांनी भांडण आवरले. त्यात दर्शन सोमवंशी याच्या खिशातील तिकिटाचे ११ हजार २३० रुपये पडून नुकसान झाले. आगार व्यवस्थापकाला घटना सांगितल्यानंतर अमळनेर पोलिस स्टेशनला या दोन महिला व तीन पुरुषांवर दंगल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.