नंदुरबार : वृत्तसंस्था
सातपुड्याच्या दुर्गम भागात अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते गमण दरम्यान पिकअप व्हॅन नदीत कोसळून दोन ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात १५ रोजी सकाळी झाला. मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी गमण येथे जात असताना हा अपघात झाला.
सविस्तर वृत्त असे कि, या अपघातात राजू ओंकार बारेला (३०, रा. कर्जाना ता. चोपडा जि. जळगाव), पोपट दत्तू ससाणे (४०, रा. नाशिक) हे दोघे जागीच ठार झाले. ज्ञानेश्वर उत्तम वाघ (रा. कुंझर ता. चाळीसगाव जि. जळगाव), सुनील बड्या पावरा (रा. खर्डी खुर्द ता. धडगाव), वाहनचालक कैलास सुरेश पाटील (३८, रा. ध्रुवनगर, नाशिक) हे जखमी झाले.
दुर्गम भागात सध्या खासगी दूरसंचार सेवेचे जाळे मजबूत करण्यासाठी मोबाइल टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले कर्मचारी एमएच १८ एए ४७३३ या वाहनाने १४ एप्रिल रोजी रात्री धडगाव येथून गमण गावाकडे निघाले होते. पिंपळखुटा ते गमण रोडवर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने उमरपाडा भागातील देवनदीत वाहन कोसळले.जखमी ज्ञानेश्वर उत्तम वाघ यांनी मोलगी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालक कैलास सुरेश पाटील (३८) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.