बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरातून गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतांना बुलढाणा शहरातून देखील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मिरवणुकीत नाचत असताना एका तरुणाची हत्या करण्यात आलीये. मिरवणुकीमध्येच या तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा शहर हादरलंय. आशुतोष संजय पडघान (वय २४ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांनी खूनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातून १४ एप्रिल रोजी भीम जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत नाचण्यावरून मृतक आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाल्याने आरोपींनी मृतक आशुतोषला ओढत नेत त्याच्यावर चाकूने वार केले. वार झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तो तेथेच पडून होता. नंतर रस्त्यावरील काही व्यक्तींनी त्याला रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मृतकावर पोलिसांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समोर आले आहे.
सदर घटनेत हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दखल केलाय . बुलढाण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रागाच्याभरात व्यक्ती थेट एकमेकांच्या जिवावर उठल्याचे अनेक घटनांतून समोर आलंय.