पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बारामती लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी हि निवडणूक अधिकच रोचक बनत चाललीय. बारामतीमधील लोकसभेची निवडणूक चुरशीची असते. यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. या मतदारसंघातून रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अर्ज घेतलाय. सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतलाय.
बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच या मतदारसंघात अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबात प्रश्न उभा राहू नये म्हणून दोन्ही पक्षांकडून अधिकचा उमेदवारी अर्ज घेतला आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे, तसेच अजित पवार यांच्या नावानेही अर्ज घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच सचिन दोडके यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.