पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरातील कात्रजमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कात्रज परिसरातील राजस सोसायटी चौकानजीक सुरू असलेल्या फनफेअरमध्ये शॉक लागून एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कात्रज राजस सोसायटी चौकानजीक लहान मुलांना खेळण्यासाठी फनफेअर पार्क आहे. लहान मुलांसाठी याठिकाणी करमणूकसाठी पाळणे, फुड स्टॉल, मिकीमाउस अशी साधने उभी करण्यात आली होती. काही प्रवेश फी आकारून लहान मुलांना करमणूकीसाठी लोक येथे येत होते.
या पार्कमध्ये खेळायला आलेल्या एका नऊ वर्षाच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १३ एप्रिल) रात्री उशिरा घडली. पार्कमधील पाळण्यामध्ये बसताना लोखंडी पायरीवरून चढत असताना शॉक लागून मुलगा बेशुद्ध पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून देण्यात आली.
त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर नेमका मृत्यू कशा मुळे झाला याची माहिती मिळेल असे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.