चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव MIDC मधील कत्तलखाना संदर्भात उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव येथील बिल्डींग मटेरीअल व्यापारी प्रेमचंद खिवसरा यांचे नाव घेऊन आरोप केला होता. यावर आता प्रेमचंद खिवसरा यांनी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर खुलासा केला आहे. त्यात त्यांनी २०१५ मध्ये उन्मेष पाटील हे आमदार असताना कत्तलखाना प्रकरण कस उघडकीस आणले होते, ? तेव्हा त्यांच्या सोबत कोण कोण होते ? नेमका बिल्डींग मटेरीअल सप्लाय चा आणि त्यांचा सबंध काय ? २०१५ मध्ये स्थगिती मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर देखील कत्तलखान्याचे काम कसे सुरु राहिले याबाबत त्यांनी सर्व घटनाक्रच आपल्या खुलाश्याच्या माध्यमातून मांडले आहे.
प्रेमचंद खिवसरा यांनी केलेला जाहीर खुलासा जश्याचा तसा
सर्वाना जय जिनेंद्र,
माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत चाळीसगाव MIDC मधील कत्तलखाना संदर्भात त्यांच्यावर होत असलेल्या आरोपासंदर्भात उत्तर देताना माझा उल्लेख केलेला असून मी त्यांनी माझ्यावर कत्तलखान्याला बिल्डिंग मटेरियल पुरविण्याचा आरोप केला आहे. या अतिशय हीन पातळीवर झालेल्या आरोपामुळे मी, माझा परिवार व माझा समाज व्यथित झाला आहोत. याबाबत मला सतत फोन येत असल्याने तसेच माझी व समाजाची बदनामी होत असल्याने म्हणून मला जाहीरपणे हा खुलासा करून सत्य काय आहे हे जनतेसमोर मांडणे गरजेचे वाटत आहे.
मी श्री.प्रेमचंद खिवसरा रा.चाळीसगाव, जैन समाजाचा असल्याने माझ्या रक्तात शाकाहार आहे. जगा आणि जगू द्या… जीवदया, प्राणी मात्रावर प्रेम करा ही माझ्या समाजाची शिकवण असून ती तत्वे पाळणारा मी सदस्य आहे.
माझा गेल्या 40 वर्षा पासून बिल्डिंग मटेरियल सप्लाय चा व्यापार महावीर बिल्डिंग मटेरियल या नावाने आहे तसेच मी भारतीय जनता पार्टी चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तसेच भाजपचे माजी महसूल मंत्री व खासदार श्री.नानासाहेब उत्तमराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील जनतेची निष्ठेने निस्वार्थ सेवा केलेली आहे.
2014-15 च्या दरम्यान मी माझ्या दुकानाच्या माध्यमातून पुणे येथील एका बांधकाम कंपनीला बिल्डिंग मटेरियल पुरवत होतो त्यावेळी अस लक्षात आले की सदर बिल्डिंग मटेरियल हे MIDC मधील एका कंपनीच्या बांधकामासाठी वापरले जात आहे. मला थोडा संशय आल्याने मी त्याबाबत मी अधिक माहिती घेण्यासाठी धुळे MIDC ऑफिस मधून कागदपत्र मिळवली. त्यात तिथे “मोहसीन एग्रो” नावाने कत्तलखाना सुरू होणार असल्याचे मला कळाले. चाळीसगाव सारख्या सांप्रदायिक गावात ही कत्तलखान्याची घाण नको तसेच माझ्या समाजाने शिकवलेली भूतदया म्हणून मी याला विरोध करण्याचा निर्णय घेतला.
सदर होणार्या कत्तलखान्याची माहिती मिळताच मी तेव्हा मुंबई येथे उद्योजक असलेले व आता आमदार असलेले श्री.मंगेशदादा चव्हाण यांच्याशी चर्चा केली व मंगेशदादांनी मला सर्व सदरील कागदपत्रे घेउन मुंबई येथे बोलावलं व त्यानुसार मी तिथे गेलो. त्याच दिवशी तत्कालीन आमदार असलेले उन्मेष दादा पाटील यांचीदेखील भेट घेतली व त्यांच्या कानावर कत्तलखाना हा विषय टाकला. नंतर आमदार उन्मेषदादा पाटील यांच्या सोबत मी तसेच श्री. मंगेशदादा चव्हाण, तत्कालीन तालुकाध्यक्ष के बी. दादा साळुंखे यांनी तेव्हाचे उद्योग राज्यमंत्री असलेले श्री. प्रवीण पोटे पाटील यांच्या मंत्रालयातील ऑफिस ला जाऊन भेट घेतली त्यांना माहिती दिली व त्यांनी सदर कत्तलखान्याला स्थगिती देण्याचे आदेश पत्रावर लिहून दिले. त्यांनंतर उन्मेषदादा पाटील यांनी वृत्तपत्रात कत्तलखान्याला स्थगिती आणल्याचा बातम्या दिल्या होत्या व मी देखील समाजाच्या वतीने त्यांच्या आभाराचे बॅनर शहरात लावले होते.
मला ज्या क्षणाला कत्तलखाना बाबत माहिती मिळाली तेव्हापासून मी पुणे येथील संबंधित कंपनीला बिल्डिंग मटेरियल पुरविणे बंद केले होते. त्यामुळे माजी खासदार उन्मेष दादांनी पत्रकार परिषदेत जे सांगितले ते खोटे असून ते अर्ध सत्य आहे. माझ चारित्र्य हे सर्व तालुक्याला माहिती असून त्यासाठी मला उन्मेषदादा पाटील यांच्या सर्टिफिकेट ची गरज नाही मात्र जनतेला माझी बाजू कळावी व त्यावेळी नेमकं काय झालं होतं हा घटनाक्रम समोर यावा म्हणून मी हा खुलासा करीत आहे.
चाळीसगाव MIDC मध्ये कत्तलखाना सुरू होत आहे हे मीच सर्वप्रथम उघडकीस आणले, वास्तविक हे काम तत्कालीन आमदार उन्मेषदादा पाटील यांचे होते. जर मला व्यापारच करायचा असता तर मी स्वतःहुन ते प्रकरण उघडकीस आणले नसते. याउलट उन्मेषदादांना माझा वडीलकीचा सल्ला आहे की त्यांनी राजकारणासाठी आरोप करताना थोडा विचार करावा. तसेच 2015 मध्ये स्थगिती दिल्यानंतर देखील सदर कत्तलखाना जागेवर बांधकाम कसं झालं हा प्रश्न स्वतःच्या अंतर्मनाला विचारावा.
धन्यवाद, जय जिनेंद्र..!
आपलाच,
श्री.प्रेमचंद खिवसरा
(चाळीसगाव)