पुणे : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. निकालानंतरही अनेक प्रलंबीत कामांप्रमाणे राम मंदिराचे काम प्रलंबीत राहिले असते, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.
एका बाजूला कडगुळ आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व त्यामुळे मी आणि पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मोदी यांना पाठिंबा देताना महाराष्ट्रासाठी आमच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचतीलच, अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यामध्ये मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा देणे, महाराष्ट्रातील गड किल्यांचे संवर्धन मादी महत्त्वाचे विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील पहिल्या पाच वर्षातील ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याता देखील मी विरोध केला. मात्र ज्या गोष्टी मला पटल्या, त्याबाबत मी कौतूकही केले होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मला भूमिका बदलणे आवश्यक वाटले त्यामुळे मी भूमिका बदलली, असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना देखील मी काही मागितले नव्हते आणि कौतुक करतानाही मागितले नाही. जे मला आवश्यक वाटले ते मी केले, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.