जळगावः प्रातिनिधी
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना जळगाव जिल्ह्यात अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता राजकीय चर्चेला उधान आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात शुक्रवारी रात्री आठ वाजता एमआयडीसीतील एका हॉटेलमधील खोलीत १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली.
उभय नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही; परंतु त्याला लोकसभा निवडणुकीची किनार असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव व रावेर हे दोन्ही मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेले आहेत. स्थानिक पातळीवर असलेल्या शिंदेसेनेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि महाजन यांच्यातील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे धुळे येथील एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी जळगाव विमानतळावर आले होते. तेथून ते हेलिकॉप्टरने धुळ्याला जाणार होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांना मोटारीने जावे लागले.