कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना अशाच एका घटनेने कोल्हापूर शहर हादरले आहे. साखरपुडा झाल्यानंतर मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे कोल्हापूर व पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (24) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका बँकेत नोकरीला होती. तिच्या लाघवी स्वभावामुळे तिचा मोठा मित्र परिवार होता. वैष्णवी कोल्हापूरमधीलच एका ढोल ताशा पथकाची सदस्याही होती. पण तिने मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट् धरला होता. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली.
वैष्णवीच्या लिव्ह इनमध्ये राहण्याच्या निर्णयाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांनी तिला अनेकदा समजावून सांगितले. पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे आई शुभांगी पवार, भाऊ श्रीधर पवार व मामा संतोष आडसूळ या तिघांनी तिला पन्हाळा तालुक्यातील देवठाणेत नेले. तिथे तिला रात्रभर काठी, लोखंडी गज व दोरीने मारहाण केली. या अमानुष मारहाणीत वैष्णवीला जिवघेण्या जखमा झाली. ती रात्रभर घरीच तडफडत पडली होती. तिला गुरुवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीची आई, भाऊ व मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार कुटुंबीयांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. शुभांगी पवार यांचे पती लक्ष्मीकांत पवार यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या स्वतःच या व्यवसाय पाहतात. त्यात त्यांना त्यांचा मुलगा श्रीधर मदत करतो. वैष्णवी एका खासगी बँकेत नोकरी करत होती. पण काही दिवसांपूर्वीच ती नोकरी सोडून पुण्यात एका मित्रासोबत राहत होती. याची खबर तिच्या आईला मिळाली. आपली मुलगी एका मुलासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याची माहिती मिळताच त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी वैष्णवीला त्याचा जाब विचारला. त्यावर आपण लिव्ह इनमध्ये राहण्यावर ठाम असल्याचे सांगितले. या मुद्यावरून माय – लेकीत सातत्याने वाद होत असल्याचीही माहिती आहे.