जळगाव : प्रतिनिधी
गुरे वाहतुक करण्याचा कुठलाही परवाना नसतांना एका वाहनात तब्बल १७ म्हशी कोंबून त्यांची निर्दयीपणे वाहतुक करणारे वाहन नशिराबाद पोलिसांनी टोल प्लाझा रोडवर पकडले. ही घटना दि. ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी हरफान हिरू खान रा. देवास, इसाक रुस्तम रा. सारबेडे बु. हबीज हुसना रा. देवास यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोल प्लाझाजवळील रोडवर दि. ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास (एमएच १८, बीजी ७२१२) क्रमांकाच्या आयशर वाहनात सुमारे १७ म्हशींची निर्दयीपणे वाहतुक करीत होते. दरम्यान, नशिराबाद पोलिसांच्या पथकाने हे वाहन अडवून तपासणी केल्यानंतर म्हशी वाहतुक करतांना वाहनात मॅटींग टाकलेली नव्हती.
तसेच त्यावर प्राणी वाहतुकीसाठीचा फलक नसून त्याचा परवाना देखील त्यांच्याकडे नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. त्यामुळे प्राण्यांची निर्दयीपणे वाहतुक करणाऱ्या हरफान हिरू खान रा. देवास, इसाक रुस्तम रा. सारबेडे बु. हबीज हुसना रा. देवास यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.