जळगाव : प्रतिनिधी
बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या काकांना तरुण रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता. तेथून घरी परत जात असतांना त्याच्या दुचाकीचा अपघात होवून प्रणव प्रशांत कुदळे (वय २२, रा. तुळजाई नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ घडली. एकुलत्या एक मुलावर दुर्देवी काळाने झडप घातल्याने त्याच्या कुटुंबियांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात असलेल्या तुळजाई नगरात प्रणव कुदळे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. वडीलांसोबत तो शहरात बॅनर लावून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. चार दिवसांपुर्वी त्याच्या बहिणे लग्न झाले आहे. तसेच त्याचे काका राहुल कुदळे हे त्याच्या बहिणीला घेवून आले होते. त्यांनंतर बुधवार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रणव हा काकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेला. त्यांना सोडून घरी परतत असतांना सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये प्रणव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चार दिवसांपुर्वीच प्रणवच्या बहिणीचा विवाह असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नकार्य आटोपल्यानंतर प्रणव हा वडीलासोबत कामाला पुन्हा सुरुवात करणार होता. आनंदाचे वातावरण असलेल्या कुदळे कुटुंबातील प्रणववर दुर्देवी काळाने झडप घालीत त्याला हिरावून घेतले. तसेच घरातील एकुलत्या एक मुलाला हिरावून घेतल्याने क्षणार्धात त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई, वडील, विवहीत बहिण असा परिवार आहे.