भुसावळ : प्रतिनिधी
लोहमार्ग पोलिसांनी अट्टल मोबाइल चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाइल जप्त केले आहेत. गजानन वसंता सुशीर (३०, धरणगाव, ता. मलकापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी प्रदीप बनसोडे (भांडूप पूर्व मुंबई) या ८ फेब्रुवारी २०२४ रोजी डाऊन शालिमार एक्सप्रेसने ठाणे ते अकोला असा प्रवास कोच एच-५ मधून करीत असताना भुसावळ सुटल्यानंतर त्यांच्या झोपेचा फायदा घेत पर्स चोरीला गेली. हे लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पर्समध्ये २५ हजारांचा मोबाइल व रोख रक्कम तसेच कागदपत्रे मिळून ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज होता.
याबाबत तपासात नरेश बगाडे यास चोरीच्या मोबाइलसह ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आरोपी गजानन सुशीर याच्याकडून चार हजारांत मोबाइल विकत घेतल्याची कबुली दिल्यानंतर सुशीर यास अटक करण्यात आली. एकूण एक लाख ३८ हजारांचे आठ मोबाइल त्याच्याकडून जप्त करण्यात आले. ही कारवाई भुसावळचे सहायक भाऊसाहेब मगरे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिवाणसिंग राजपूत, धनराज लुले, विशाल चौधरी, बाबू मिर्झा, राजेंद्र गवई तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक महेंद्र कुशवाह, इमरान खान आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार राजेंद्र गवई करीत आहेत.