मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या आणखी 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. तर जळगावमधून करण पवार, हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील व पालघर लोकसभा मतदार संघातून भारती कामडी या सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्तीला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी बुधवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना उद्धव ठाकरे यांनी कल्याण, जळगाव, हातकणंगले व पालघर या 4 लोकसभा मतदार संघांतील आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर या कार्यकर्तीला संधी दिली आहे. कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे आता शिंदे यांना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा सामना करावा लागेल.
याशिवाय जळगाव लोकसभा मतदार संघात करण पवार यांना संधी देण्यात आली आहे. करण पवार हे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे समर्थक आहेत. त्यांचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव आहे. विशेषतः करण पवार यांनी बुधवारीच उन्मेश पाटील यांच्यासोबत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उन्मेश पाटील यांचीही मोठी ताकद मिळणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात करण पवार यांचा सामना भाजपच्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्मिता वाघ यांच्याशी होईल.
ठाकरे गटाने पालघर लोकसभा मतदार संघातून भारती कामडी तर हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भारती कांबळी या आदिवासी समुदायाच्या शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघ आपल्या मित्र पक्षाला सोडण्याची तयारी दर्शवली. मुंबई उत्तर लोकसभा आमचा मित्रपक्ष लढणार असेल तर ती त्यांना दिली जाईल. अन्यथा आम्ही आमचा उमेदवार तिथे देऊ, असे ते म्हणाले. मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर आम्ही उमेदवार दिलेत. उर्वरित 2 जागा मित्र पक्षांनी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. शिवसेना या दोन्ही ठिकाणी त्यांना मदत करेल. सद्यस्थितीत देशाती हुकूमशाही सरकारविरोधात लाट असून, ही लाटच कोणत्याही जागा जिंकून देण्याएवढी सक्षम आहे, असेही ते यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले.