मुंबई : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात भाजपकडून उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर झाल्या असून उमेदवारांनी गाठी भेटी देखील सुरु केली असतांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारलेले नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईत आहेत. भाजपचे युवा नेते पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करन पवार त्यांच्या सोबत आहेत. पवार यांना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे.
पवार व पाटील हे मित्र आहेत. आपल्या मित्रासाठी आता खासदार पाटील हे सरसावणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळें आता दोघेही आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. खासदार उन्मेष पाटील व करन पवार यांच्या भाजप सोडल्यामुळे तसेच करन पवार यांचे ठाकरे गटाच्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे समीकरण बिघडणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे या प्रवेशानंतर भाजप काय चाल खेळणार याकडेच लक्ष असणार आहे.