अमळनेर : प्रतिनिधी
नळ आल्यामुळे पाणी भरण्यासाठी पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिन लावताना विजेचा धक्का लागल्याने एका १२ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील हर्षल योगेश पाटील (वय १२) असे मयत बालकाचे नाव आहे. हर्षल हा अमळनेर शहरातील साने गुरुजी शाळेतील सहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील योगेश दगडू पाटील हे शेती करतात. शिक्षणासाठी तो आई, वडील व भावासह गलवाडे रस्त्यावरील साई गजाजन नगरात वास्तव्यास होता. १ रोजी त्याचे आई, वडील सबगव्हाण येथे शेतात तर मोठा भाऊ पेपर देण्यासाठी गेला होता. या वेळी हर्षल एकटाच घरी होता. दुपारी १ वाजता नळाला पाणी आल्याने हर्षल हा पाणी भरण्यासाठी विजेचा पंप सुरु करण्यासाठी गेला. या वेळी मेल-फिमेल पिन जोडत असताना त्याचे हात ओले असल्याने नजरचुकीने त्याला विजेचा शॉक लागल्याने तो जिन्याखालीच कोसळला अन् मयत झाला. दरम्यान, मोठा भाऊ पेपर संपल्यावर घरी आला असता त्याला हर्षल जिन्याखाली पडलेला दिसला. मात्र, तोपर्यंत उशिर झाल्याने हर्षल जीवानिशी गेला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, हर्षलला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी ५ वाजता सबगव्हाण येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास अमळनेर पोलीस करत आहेत. हर्षलच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण गाव व अमळनेर परिसर शोक व्यक्त केला जात आहे.