चाळीसगाव : प्रतिनिधी
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा अपघात झाल्याचा बनाव करून खून करण्यात आल्याची घटना पळासखेडे, ता. भडगाव येथे रविवारी रात्री उघडकीस आली. याबाबत पत्नी व आळंदी येथील कीर्तनकार महाराजाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र गंगाधर शेळके (रा. खेड आळंदी, पुणे) आणि पुष्पा पाटील अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किशोर शिवाजी पाटील (४५, रा. पळासखेडे, ता. भडगाव) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तो पत्नी पुष्पा समवेत शेतीकाम करती होता. त्यांना मुलगा व मुलगी आहे. मुलगी कीर्तनाचे शिक्षण घेण्यासाठी आळंदी येथे आहे. त्यामुळे पुष्पाचे आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज याच्याशी काही अनेक वर्षांपासून ओळख होती. पाटील हा त्याच्याकडून उसनवारीने पैसेही घ्यायचा, यावरून पती पत्नीमध्ये वादही व्हायचे. कर्ज फेडण्यासाठी आपल्याला महाराज पैसे देणार आहेत, असे सांगून पुष्पा हिने किशोर यास रविवारी रात्री शेळके याच्या कारमध्ये बसवून रवाना केले. वाटेतच त्याचा अपघात झाल्याचा बनाव करून त्याला ठार केले आणि मृतदेह पळासखेडे तरवाडे रस्त्यावर फेकून दिला.
दरम्यान, रात्री काही दुचाकीस्वार या रस्त्याने जात असताना त्यांना कुणी तरी रस्त्यात पडले असल्याचे दिसले. त्यांनी पळासखेडे येथील पोलिस पाटील ज्ञानेश्वर गोरख पाटील यांना माहिती दिली. त्यांनी भडगाव पोलिसांना ही घटना कळविली. त्यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. त्यावरून पोलिसांना घातपाताचा संशय आला. त्यावरून तपास केला असता वरील प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कीर्तनकार महाराजला अटक केली. त्याच्याकडील चारचाकीही जप्त करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सपोनि चंद्रसेन पालकर, शेखर डोमाले यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.