नंदुरबार : वृत्तसंस्था
नवापूर तालुक्यातील खर्डीबर्डी येथील सासुरवाडीला पत्नीला न्यायला आलेल्या पती आणि त्याच्या आई-वडिलांना पत्नीच्या माहेरच्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. उमेश वामन देसाई (रा. टेंभे ता. साक्री) असे मारहाण झालेल्या पतीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, उमेशचा विवाह खर्डीबर्डी गावातील अश्विनीसोबत झाला होता. त्यानंतर वाद झाल्याने अश्विनी ही माहेरी आली होती. शनिवारी उमेश व त्याच्या आई- वडिलांनी अश्विनी हिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यातून वादावादी झाली. विवाहितेचे वडील सुक्या गावित (५०) यांच्यासह गावातील इतर नातेवाइकांनी मिळून उमेश व त्याच्या आई-वडिलांना मारहाण केली. याप्रकरणी उमेश देसाई यांनी नवापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुक्या गावित (५०) सह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.