मुंबई : वृत्तसंस्था
मालाडच्या मालवणी परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खून प्रकरणातील फरार बनावट डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. परवेझ अब्दुल अजीज शेख असे आरोपीचे नाव आहे. बनावट रुग्णालय चालवल्याप्रकरणी त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 12 ने ही कारवाई केली. मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी परवेज शेख याचा शोध घेत असताना मालाड येथील मालवणी परिसरातील बेकायदेशीर क्लिनिकचा भांडाफोड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पोलीस ठाण्यात 2023 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी हा मालवणी परिसरात बोगस डॉक्टर म्हणून अजिज पॉली क्लीनिक चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकाने मालवणी परिसरातील अजिज पॉली क्लीनिकवर छापा टाकला. तेव्हा परवेज अब्दुल अजीज शेख हा कोणताही वैद्यकीय परवाना नसताना डॉक्टर असल्याचं भासवून बेकायदेशीररित्या रुग्णांना इंजेक्शन आणि सलाईन देऊन फसवणूक करत होता, असं आढळलं. असल्याचं आढळले. वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय रुग्णालय चालवणाऱ्या परवेझ अब्दुल अजीज शेख याला अटक केली.
तसेच आरोपीची पत्नी बीयूएमएस पदावर कार्यरत होती, मात्र तिच्याकडे बीयूएमएस पदासाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे तपासात समोर आले. अजीज पॉली क्लिनिकमध्ये हे दोन्ही बनावट डॉक्टर लोकांना विविध आजारांसाठी इंजेक्शन, सलाईन आणि औषधे देत असत असेही समोर आले. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. परवेझ अब्दुल अजिज शेख याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाणे, मालवणी पोलीस ठाणे आणि मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या बायकोविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.