मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीची जोरदार धामधूम सुरु असतांना सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींसह भाजपवर आरोप केले आहे.
ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरीबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत आहेत ती ईडीच एक घोटाळा आहे अशी टीका देखील केली असून दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले असा गंभीर आरोप ठाकरे गटाने मुखपत्रातून भाजपवर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांवरून ठाकरे गट सातत्याने भाजपवर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. ”ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरीबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत आहेत ती ईडीच एक घोटाळा आहे. दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले. ‘चॅरिटी बिगिन्स अॅट होम’ याप्रमाणे आधी या पैशांचे वाटप जनतेला करा, मग ईडीच्या कस्टडीमधील तीन हजार कोटींच्या गाजराची पुंगी वाजवा. पंतप्रधान मोदी म्हणजे आश्वासनांचा घोटाळा आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. 15 लाखांच्या भूलभुलय्यात ती फसली, मात्र ‘ईडी’ रकमेची तुमची लोणकढी थाप प. बंगालमधील जनतेला फसवू शकणार नाही, हे लक्षात ठेवा”, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
”तोंडभरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही. मागील 10 वर्षांपासून देशातील जनता याचा चांगलाच अनुभव घेत आहे. आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा प. बंगालच्या आकाशात सोडला आहे. प. बंगालमधील गरीबांचा लुटलेला पैसा ‘ईडी’ने जप्त केला आहे. तो त्या राज्यातील गरीबांना वाटणार, असे गाजर मोदी यांनी तेथील जनतेला दाखविले आहे”, असे म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
”मोदी बोलतात खूप, भावनांना हात घालत आश्वासनांची पीकपेरणी करण्यात ते तरबेज आहेत, परंतु आतापर्यंत त्यांच्या या पेरणीचे पीक आपल्या पदरात का पडू शकलेले नाही, हा प्रश्न आजही जनतेला पडला आहे. पुन्हा त्याचे उत्तर देण्याऐवजी पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष आश्वासनांचे बिनहवेचे फुगे हवेत सेडत बसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी आणि त्यांच्या पक्षाने ‘महंगाई डायन’ नष्ट करण्याचे, काही कोटी रोजगार निर्माण करण्याचे, जीवनावश्यक वस्तूंची स्वस्ताई आणण्याचे आश्वासन दिले होते. आज सलग दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतर काय चित्र आहे? ना महागाई हटली ना बेरोजगारी’, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.