जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावातील वराडे गल्लीत शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून अचानकपणे दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या दगडफेकीमध्ये काही पोलिस कर्मचारी व नागरिक असे ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दगडफेकीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा व दंगा नियंत्रण पथक शिरसोली प्र.बो. येथे पोहचले होते. गुरुवारी दि.२८ शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक रात्री ८ वाजता गावातील वराडे गल्लीतील एका धार्मिक स्थळाजवळून जात असतांना अचानक मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे बबन आव्हाड यांच्यासह पोलिस पथक शिरसोली गावात दाखल झाले आहे.
या मिरवणुकीवर दगडफेक आणि विटा फेकून मारल्याने काहींच्या घरावर देखील दगड पडल्याने विशाल दिलीप पाटील (वय २५, रा. शिरसोली) हा युवक जखमी झाला. मिरवणुकीत सहभागी असलेले नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी असे एकूण ५ ते ६ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. यात काही वाहनांचे देखील नुकसान झाले. मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) हे देखील जखमी झाले आहेत.