नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक घटना सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर नेहमीच येत असतात अशीच एक संतापजनक घटना छत्तीसढमध्ये समोर आली आहे. एका शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्याच शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला आहे. शाळेत एक शिक्षक दारू पिऊन आला होता. त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी चप्पल आणि बुट फेकून मारलेत. शिक्षकाला विद्यार्थ्यांनीच अगदी शाळेबाहेर पळवून लावलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर घटना एक आठवड्यांपूर्वीची असल्याचं समजलं आहे. बस्तर ब्लॉक येथील पालीभाटा प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. शाळेमध्ये एक शिक्षक दररोज नशेत यायचा. शाळेत येतानाच तो आधी दारू पिऊन येत होता. त्यानंतर शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी तो शाळेत झोपून घ्यायचा. सर उठा आम्हाला शिकवा, असं विद्यार्थी त्याला बोलायचे. मात्र विद्यार्थ्यांनी त्याला उठवल्यावर शिक्षक त्यांना शिविगाळ करत होता. या कटकटीला विद्यार्थी फार कंटाळले होते. शाळेत अन्य वरिष्ठांकडे तक्रार करण्याची देखील काहीच मुभा नव्हती. कारण शाळेत एकच शिक्षक होते.
तेच सर्व विद्यार्थ्यांना शिकवत होते. शेवटी हा त्रास एकदाचा संपवण्याचा निर्णय येथील मुलांनी घेतला. नेहमीप्रमाणे शिक्षक दारू पिऊन वर्गात आला. त्यावर विद्यार्थ्यांनी त्याला चप्पल मारण्यास सुरूवात केली. त्यामुळे शिक्षक वर्गाबाहेर पळू लागला. तो आपल्या दुचाकीच्या दिशेने धावला आणि पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र विद्यार्थ्यांना त्याचा प्रचंड राग आला होता. त्यामुळे विद्यार्थी देखील शिक्षकाच्या मागे पळू लागले. विद्यार्थ्यांनी या शिक्षकाला भरपूर चपला आणि बुटांनी मारलं. त्यावर शिक्षक थेट शाळेबाहेर पळून गेला. सदर घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.