मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी आता अनेक मतदार संघात उमेदवारी निश्चित झाली आहे मात्र काही मतदार संघात मात्र उमेदवारीची तिढा सुटलेला नसताना नुकतेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने पूर्ण पाठिंबा दिला आहे. शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केले. तुम्ही आम्हाला सहकार्य केले असते, तर जागा वाटपाचा तिला सुटला असता, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात मला विचारून काहीही उपयोग नाही. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनाच विचारा, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या जागा वाटपावर आपले मत व्यक्त केले. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. ते एकमेकांसोबतच भांडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने अद्यापही अंतिम निर्णय आमच्यापर्यंत आलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही अजूनही तयार आहोत मात्र, महाविकास आघाडीत अंतर्गत कलह सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार असल्याचे स्पष्ट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका सांगायला नकार दिला. त्या नंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. महाविकास आघाडी संदर्भात आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना पत्र लिहिले आहे. काँग्रेसच्या सात जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे आम्ही त्यांना सांगितले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सोबत आमचे सात जागांबाबत एकमत झाले तर चांगलेच आहे. आणि ते जर होत असेल तर खरगे यांनी आम्हाला कळवावे, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.