नाशिक : वृत्तसंस्था
मुंबई एलटीटी – गोरखपूर गोदान एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी नाशिक रोड रेल्वे स्थानकातून मार्गस्थ होताच शेवटच्या पार्सलच्या कम्पार्टमेंटला आग लागली. या बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर येऊन आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने ही गाडी त्वरित थांबविण्यात आली. शेजारील डब्यातील प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्याने जीवितहानी टळली. यामुळे मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या उशिराने धावल्या
पार्सलच्या कंपार्टमेंटमध्ये कुर्ला व कल्याण येथून दुचाकी व इतर सामानाचे बॉक्स ठेवले होते. कल्याणमधून प्रयागराजचे पाच व शाहगंजचे चार पार्सल ठेवण्यात आले, त्यामध्ये एक दुचाकीही होती. आगीमध्ये आठ ते नऊ दुचाकी जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. त्या दुचाकीमध्ये एक इलेक्ट्रिक दुचाकी असल्याचे समजते, तसेच टी-शर्टचे बॉक्स व इतर सामानाचे बॉक्स असल्याचे बोलले जात आहे. या दुचाकीमुळे आग लागली किंवा कसे, हे समजू शकले नाही.