भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनीत राहणाऱ्या सख्ख्या भावांना रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून भावांची तीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दि. २० रोजी भुसावळ शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र प्रकाश संसारे आणि त्यांचा भाऊ सचिन संसारे यांना संशयित आरोपी सागर शिवदास वानखेडे (रा. शांतीनगर) याने रेल्वेमंत्री आणि बड्या रेल्वे अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली तसेच रेल्वेत टीसी म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
त्यासाठी वानखेडे याने संसारे यांच्याकडून २ मे २०१७ ते डिसेंबर २०२३ या काळात वेळोवेळी तीस लाख रुपये घेतले. मात्र रेल्वेत नोकरी मिळाली नाही. आणि वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक केली. त्यानंतर संसारे यांनी शहर पोलिस ठाण्यात सागर शिवदास वानखेडे याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.