नाशिक : वृत्तसंस्था
सातबारा उतार्यावर फेरफार नोंद घेण्यासाठी तडजोडीअंती दहा हजारांची लाच घेताना चांदवड तालुक्यातील कुंदलगाव, व सजा शिंगवे तलाठ्याला नाशिक एसीबीने अटक केली. विजय राजेंद्र जाधव (33, श्रमसाफल्य कॉलनी, प्लॉट नंबर 11, वडेल रोड, वलवाडी, देवपूर, धुळे) असे अटकेतील तलाठ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरूष तक्रारदार यांच्या आई, मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव, ता.चांदवड येथील शेती वाटपासाठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला आहे. कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव, ता.चांदवड येथील गट नंबर 410, 412, 414 या गटातील 50-50 गुंठे जमिनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबार्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांच्याकडे अर्ज केला होता. तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडल अधिकारी यांच्यामार्फत यातील आलोसे यांच्याकडे देण्यात आला होता. या कामासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष लाचेची मागणी केली व लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .
नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत पांडुरंग जाधव यांच्या नेतृत्वात हवालदार प्रणय इंगळे, अनिल गांगुर्डे, चालक विनोद पवार आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.