नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर होताच देशात आचार संहिता लागू झालीय. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे देखील रिंगणात उतरणार आहे. राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणार आहेत. मनसेकडून लोकसभेसाठी २ जागांची मागणी केली गेली आहे. या जागांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे यांनी दिल्ली गाठलीय.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी राजकीय पक्षांची तयारी मात्र अजूनही अपूर्ण आहे. अनेक आघाड्याच्या जागावाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे. जागावाटपाचा तिढा सुटून उमेदवारांना प्रचाराचा पुरेसा वेळ मिळावा, यासाठी राजकीय पक्षांकडून बैठकांचा सपाटा चालू आहे. यात भाजपही मागे नसून दिल्लीत बैठका सत्र गेल्या काही दिवसांपासून सलग चालू आहे. आजही भाजपने जागवाटपाच्या निर्णयासाठी बैठक बोलवली आहे.
आजच्या बैठकीची विशेष गोष्ट म्हणजे राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात होत आहे. या बैठकीत राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र येथील जागावाटपांचा निर्णय होणार आहे. महाराष्ट्रातील जागावाटपांचा तिढा सोडवण्यात येणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान राज्यातील महायुतीला आता इंजिन जोडलं जाण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या बैठकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मनसेकडून लोकसभेच्या २ जागा मागितल्या गेल्या आहेत. जर मनसेला लोकसभेला जागा न दिल्यास त्यांच्या एक जणाला राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभेत पण समाधानकारक जागा देण्याचे सुद्धा आश्वासन भाजपकडून देण्यात येण्याची शक्यता आहे.