जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात कुटुंबातील सर्वजण कामावर गेलेले असल्याने गॅस सिलेंडर फुटल्याने लागलेल्या आगीमध्ये पत्र्याची तीन घरे जळून खाक झाले. तसेच घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या विळख्यात सापडल्याने चार कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली. ही घटना सोमवार दि. १८ रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरातील साईनगर भागात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची घरे आहेत. यापैकी एका शेजारी एक असलेल्या पत्र्यांच्या तीन घरांमध्ये नितीन भटकर, अशोक भटकर, रोहित सुनील भारुळे, रमेश यशवंत शिंदे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी या चारही कुटुंबातील सदस्य नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यानंतर अचानक त्यांतील एका घराला आग लागली, त्या आग पसरत गेल्याने शेजारील दोन्ही घरे आगीने अवघ्या काही वेळातच आपल्या विळख्यात घेतल्याने त्यात संपुर्ण घरे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्य घराकडे पोहचले, मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अग्नीशमन विभागाला देण्यात आली. त्या वेळी निवांत इंगळे, प्रदीप धनगर, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, चेतन सपकाळे हे तेथे पोहचले व त्यांनी दोन बंबाद्वारे आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे त्या घरांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. कुटुंबियांनी घरात आवश्यक व महत्त्वाची कागदपत्रे कपाटात ठेवलेले होते. आगीमध्ये ते देखील जळून खाक झाले. इतकेच नव्हे घरात ठेवलेली रोख रक्कमही जळून नष्ट झाल्याने या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.