लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील नांदेड शिवारात बिबट्या दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक अर्ज देवूनही वनविभाग डोळे झाकून दुध पिण्याचे सोंग करत आहे.
धरणगावातील नांदेड शिवारातील एका शेतात मध्यरात्री काही शेतकरी शेतात काम करत असतांना बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आला. यावेळी काही शेतकऱ्यांनी बिबट्याला मोबाईलमध्ये कैद केले आहे. यापुर्वी तालुक्यातील चमगाव गावाजवळील शिवारात असलेल्या नदीच्या काठावर बिबट्याने एका वासरूचा फडश्याप पडला होता. त्यावेळी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सुचना वनविभागाला दिल्या होत्या. मात्र वनविभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत पाच घटना घडल्या आहेत. बिबट्या पकडण्यात वनविभागाकडून उदासिनता दिसून येत आहे. वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करून घेवून पुन्हा याकडे दुर्लक्ष केले जाते. बिबट्याला पकडून जेरबंद करण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुलक्ष केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे.