रावेर : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे ब-हाणपूर बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण १२ प्रवासी जखमी झाले, यातील पाचजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास विवरे गावाजवळ घडला, याप्रकरणी निंभोरा पोलिसांत ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे – ब-हाणपूर बस (क्र. एमएच ४० वाय १८७) ही ४१ प्रवासी घेऊन विवरे बुद्रुकहून रावेरकडे येत असताना स्मशानभूमीजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एचआर ५५ एक्स २९८३) जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालकाच्या मागील बाजूच्या पाच ते सहा खिडक्यांसह बसचा पत्रा चिरला आणि बस रस्त्याच्याखाली उतरली. या अपघातात एकूण १२ जण जखमी झाले आहेत.
त्यातील पाच प्रवाशांच्या तोंडाला. डोक्याला, छातीला गंभीर दुखापती झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी यांच्या पथकाने तातडीचे प्राथमिक औषधोपचार केला. पाचजणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सातजण किरकोळ जखमी झाले होते. त्यांना औषधोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. निभोरा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याने प्रत्यक्षदर्शींनी नाराजी व्यक्त केली. बसचालक डी. डी. पाटील व वाहक एस. एस. जाधव यांच्या फिर्यादीवरून निभोरा पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.