धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील नगरपालिके समोरील मोटर रिवाइंडिंगची चार दुकाने मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून या दुकानांमधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांसह व्यापारी धास्तावले असून चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
धरणगावातील सचिन भागवत यांचे रेणुका मशनरी रिपेरिंगचे दुकान असून या दुकानातील २१ हजारांची ७० किलोची कॉपर तार २९ फेब्रुवारीला तर ९ हजारांची ३० किलो कॉपर तार ७ मार्चला चोरुन नेली होती. यात त्यांचे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. तर राजेंद्र चोरी यांच्या हितेश इलेक्ट्रिकल दुकानातील १५ हजारांची ५० किलो कॉपर तार तसेच सत्तार खान पठाण यांच्या रॉयल इलेक्ट्रिक दुकानातील ७ हजार ५०० रुपयांची २५ किलो कॉपर तार असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांची कॉपर तार अज्ञात चोरट्यांनी चोरुन पोबारा केला आहे. यात कापुरे इलेक्ट्रिकलचे पत्रे कापून चोरट्यांनी चोरी केली आहे. या प्रकरणी सचिन सुभाष भागवत यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आठ दिवसा पूर्वीसुद्धा हीच दुकाने चोरट्यांनी फोडली होती. त्यावेळी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच ६ रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मोटर रिवाइंडिंगचे दुकानाचे संचालक आले होते. परंतु, पोलिसांनी त्यांची समजूत काढून आम्ही तपास करू, असे आश्वस्त केले होते. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा चारही दुकानातून चोरट्यांनी चोरी केली. तर ४ तारखेला ही स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटीतील ७ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहेत. धरणगावात पोलिसांच्या धाक संपला आहे म्हणूनच भुरट्या चोरांचा उद्रेक वाढला आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तर पोलिसांनी भुरट्या चोरांविरुद्ध त्वरित कारवाई करुन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी दुकानदार व नागरिक करत आहेत. तर धरणगावात पोलिसांनी रात्री गस्ती वाढवावी, अशी मागणीही होत आहे.