नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना एका तेरा वर्षीय मुलाने त्याच्या समवेत खेळणाऱ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या बालकाला सांडपाण्यात फेकल्याची घटना घडली आहे. या बालकाच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने या बालकाचा मृत्यू झाला.
सुरुवातीला पाण्यात पडल्याने लहानग्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नंतर सीसीटीव्ही तपासला असता सदरील घटना निर्दशनात आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरील विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेतला जात आहे. काही मुले हे सांडपाण्याच्या डबक्याजवळ खेळत असलेले सीसीटीव्हीमध्ये दिसते. काही वेळाने एका तेरा वर्षीय मुलाने हस्सान मलीक मुदस्सीर हुसेन या साडेतीन वर्षाच्या मुलाला सांडपाण्याच्या डब्यात फेकून दिले. त्यामुळे त्याच्यासोबत असलेली सर्व मुले घाबरली. त्यांनी तेथून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली आहे.
या घटनेनंतर मृत मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन पवारवाडी पोलिस ठाण्यात विधी संघर्षग्रस्त बालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरून डबक्याजवळ असलेल्या कारखान्याचा सीसीटीव्ही तपासण्यात आला. त्यानंतर ही घटना निदर्शनास आली. सुरुवातीला या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी माजी नगरसेवक शेख खालीद हाजी यांच्या सूचनेवरून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा सखोल तपास केला जात आहे.