चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील अडावद येथील वटार शेतशिवारात मुख्य वीज वाहिनीवर काम करत असताना विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना अडावद-वटार शेतशिवारात घडली. ही घटना बुधवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील वटार शेतशिवारात मुख्य वीज वाहिनीवर काम सुरू असताना अचानक विजेच्या धक्क्याने दिलीप मोतीराम बारेला (२९, आडगाव, ता. चोपडा) या वायरमनचा मृत्यू झाला. सकाळी वीज कर्मचाऱ्यांसोबत मुख्य वाहिनीवर काम करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का बसला. यावेळी दिलीप यांना तत्काळ अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने चोपडा येथे हलवण्यात आले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी दोषीवर गुन्हा दाखल होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नसल्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबीयांनी घेतला असून, उपजिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. अखेरीस वायरमन मृत्यूप्रकरणी सायंकाळी अडावदचे सहाय्यक अभियंता सचिन केदारे, कार्य. अभियंता व ठेकेदार रमेश पवार, सुमित चौधरी, उपकार्यकारी अभियंता साळुंखे, योगेश पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिपीवरून अवैध कनेक्शन जोडून वीज जोडणी केल्यानेच वायरमनचा मृत्यू झाल्याचे सांगत सहाय्यक अभियंता सचिन केदारे यांनी शेतकरी साखरलाल महाजन यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे. याप्रकरणात महाजन यांच्याविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.