जळगाव : प्रतिनिधी
पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात मर्जीप्रमाणे शपथपत्र लिहून देण्यासाठी अॅड.पीयूष नरेंद्र पाटील (रा. दीक्षितवाडी) यांचे अपहरण करून त्यांच्या काकासह अन्य जणांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली तसेच खिशातील आठ ते नऊ हजार रुपये काढून घेतले. ही घटना २८ डिसेंबर २०२३ ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान दीक्षितवाडीत घडली. या प्रकरणी ४ मार्च रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोन काकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून अॅड. पीयूष पाटील यांनी यापूर्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याविषयी आम्ही सांगू त्याप्रमाणे शपथपत्र दे या मागणीसाठी त्यांचे काका संजय भास्कर पाटील, विजय भास्कर पाटील यांच्यासह सुहास वसंत चौधरी, नरेंद्र गुलाब गांगुर्डे आणि शैलेजा नरेंद्र गांगुर्डे या पाच जणांनी अॅड. पीयूष पाटील यांचे अपहरण केले, असा आरोप आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्च वॉरंट घेऊन जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि मीरा देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व त्यांचे सहकारी हे विजय पाटील यांच्या घरी पोहचले. पोलिसांनी घरझडतीसाठी पाटील यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने तासाभरानंतर पोलिस माघारी परतले