जळगाव : प्रतिनिधी
बहिणीकडे जेवणासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख ६० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख १४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी दि.२ बळीराम पेठेतील एजीएम प्लाझामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम पेठेतील मुजाईद खान अय्युब खान हे २ रोजी रात्रीच्या सुमारास उस्मानिया पार्कमध्ये बहिणीकडे जेवणासाठी गेले होते. रात्री पावसाचे वातावरण असल्याने ते तेथेच मुक्कामी थांबले होते. दुसऱ्या दिवशी भाऊ अबुबकार खान हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडाच दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी एक लाख ६० हजारांची रोकड, २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १० ग्रॅमचे सोन्याचे कानातले, १५ ग्रॅमचे मंगळसूत्राची पोत, १० ते १५ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या आणि मोबाईल असा एकूण ४ लाख १४ हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. मुजाईद यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.