चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एकूण १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बहाळ येथील शेतकरी भगवान काशिनाथ मोरे यांनी बँक ऑफ बडोदा चाळीसगाव शाखेतून ८० हजार रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम व पासबुक घेऊन त्यांनी कापडी पिशवीत ठेवले. ही पिशवी घेऊन दुचाकीवरून जात असताना रस्त्यात राष्ट्रीय महाविद्यालयाच्या कॉर्नरजवळ त्यांच्या पाठीला खाज सुटू लागली. त्यांनी हातातील पिशवी भेळच्या गाडीवर बाजूला ठेवून पाणी घेतले. पाणी पिऊन झाल्यावर पिशवी आढळली नाही काही क्षणातच हा प्रकार घडल्याने आजूबाजूला शोध घेतला असता, पैशाची पिशवी अज्ञाताने लंपास केल्याची त्यांची खात्री झाली.
दुसऱ्या घटनेतही असाच प्रकार घडला. शनिवारी दुपारी २:३० वाजता सेवानिवृत्त कर्मचारी शेनपडू आनंदा बागूल यांनी बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव शाखेतून ४१ हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर एका हॉटेलजवळून जात असताना त्यांच्या अंगावर काहीतरी पदार्थ टाकून चोरट्यांनी त्यांचे लक्ष विचलित केले व त्यांच्याजवळील ४१ हजारांची रक्कम चोरी करून तेथून पसार झाले, या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे