जळगाव : प्रतिनिधी
शहरातील अजिंठा चौक परिसरात भुसावळ रस्त्यालगत बुधवारी गावठी कट्टा घेऊन फिरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद हमीद ऊर्फ अण्णा (वय २४, रा. गेंदालाल मिल) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचा मुगीर बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हमीद हा युवक अजिंठा चौक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अर्शद शेखला ताब्यात घेतले. पोलिस नाईक सुधीर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, न्या. व्ही.एम. देशमुख यांनी त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी काम पाहिले.