जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ बीड येथील रहिवासी असलेला विश्वंभर खडके हा विद्यार्थी ‘जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ईएनटीसी’च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहत होता. सोमवारी महाविद्यालयात ‘मिसमॅच डे’ हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी तो मित्रांसह गेला होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो तेथून वसतिगृहात परतला.
संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा ‘रुममेट’ शिवमसिंह जितेंद्रसिंह राजपूत खोलीवर परतला तेव्हा दरवाजा आतून लावलेला होता. शिवमसिंहने विश्वंभरला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर शिवमसिंहने दरवाजा जोरात लोटला असता कडी उघडली व त्याला विश्वंभरने गळफास घेतल्याचे दिसले. ते दृष्य पाहताच शिवमसिंह खाली गेला व इतर विद्यार्थ्यांसह त्याने ती माहिती रेक्टरला दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आले. नंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.